चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील उपक्रमावर विरोधकांची टीका

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोथरूड चर्चेत आले आहे. आता कोथरूडमधील महिलांना भाऊबिजेच्या दिवशी साडी भेट देण्याच्या उपक्रमावर विरोधकांकडून टीका होत आहे.

पाटील यांच्याकडून कोथरूडमधील महिलांना भाऊबिजेचे औचित्य साधून मंगळवारपासून साडय़ांचे वाटप सुरू करण्यात आले असून, साडीवाटपाची जबाबदारी भाजपच्या नगरसेवकांवर सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  योजना जाहीर झाल्यानंतर काही नगरसेवकांनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे.कोथरूड विधानसभा मतदारसंघात २४ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात पाटील यांना  २६ हजारांचे मताधिक्य मिळाले. मनसेचे किशोर शिंदे हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार होते.

राष्ट्रवादीकडून आज आंदोलन

कोथरूडमधील महिलांना साडीवाटपाचे प्रलोभन दाखवून लोकशाहीची थट्टा करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी   डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

यंदाची दिवाळी कष्टकरी, गरजूंबरोबर साजरी करावी, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागांत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोथरूडमधील कष्टकरी महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाला साडी देण्याचे आवाहन केले. साधारणपणे दहा हजार साडय़ा जमा होणार असून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. – चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्ष, प्रदेशाध्यक्ष

सांगली, कोल्हापूर, पुणे या शहरांत अतिवृष्टी झाली. पुराचा फटका अनेकांना बसला. या भागातील महिलांना साडी तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्याची आवश्यकता होती. साडीवाटप योजना म्हणजे आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. विकासाचे राजकारण करणाऱ्या भाजपला साडीवाटपाची गरज का पडली? – किशोर शिंदे, मनसेचे पराभूत उमेदवार