पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या नावाने पक्षाच्याच महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पदाधिकाऱ्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या होत्या. दरम्यान, बंगल्याबाहेर संशयितांनी आमचा दादा येथे असताना तू येथे का आलीस, असे विचारून धमकी दिली.

फिर्यादी महिला पुन्हा बंगल्यात परत गेली. एक व्यक्ती मोटार घेऊन फिर्यादी महिलेला सोडायला आली असता, काही महिलांनी फिर्यादी महिलेच्या मोटारीला घेराव घातला. फिर्यादी महिला तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात गेली असता दोन महिलांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील तपास करत आहेत.

दरम्यान, घटना घडली तेव्हा मी तिथे नव्हतो. मी कोणालाही धमकी दिली नाही. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठी गुन्हा दाखल केल्या असल्याचे संबंधित पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.