पुणे : लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाची चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धनकवडीतील छत्रपती संभाजीनगर भागात राहायला आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार व्यावसायिकाची ओळख आहे. आरोपीने लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी तक्रारदाराकडे केली होती. गुप्तचर यंत्रणेकडून ३८ कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क भरावे लागणार आहे, अशी बतावणी आरोपींनी त्यांच्याकडे केली होती. आरोपींनी त्यांच्याकडे बतावणी करुन वेळोेवेळी चार कोटी सहा लाख सात हजार रुपये उकळले. तक्रारदाराकडून ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी रक्कम घेतली. त्यानंतर आरोपींनी त्यांना रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर ज्येष्ठ नागरिक वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. ते ४ सप्टेंबर रोजी नवी पेठेतील लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील एका एटीएममधून पैसे काढत होते. त्या वेळी त्यांच्या मागोमाग एक चोरटा एटीएममध्ये शिरला. मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. पैसे काढताना चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड वापरले. त्यामुळे एटीएममधून पैसे निघाले नाहीत. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड चोरले. एटीएम कार्डचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून ५० हजारांची रोकड चोरली. खात्यातून पैसे चोरण्यात आल्यानंतर ज्येष्ठाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करत आहेत.
एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टिळक रस्ता, रास्ता पेठ, वारजे, खडकी बाजार परिसरात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना घडल्या आहेत.