पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत (एसटी) पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात २०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पूर्वीपेक्षा जास्त बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित स्वारगेट, दापोडी ‘चार्जिंग स्टेशग्स’वर एकाच वेळी ३६ बस चार्ज होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार, आयुर्मान संपलेली १५ वर्षांपुढील सरकारी वाहने मोडीत काढण्यात येत आहेत. तसेच, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, राज्य सरकारनेही एसटी महामंडळातील जुन्या बस मोडीत काढून इलेक्ट्रिक बस वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे, एसटी महामंडळात येत्या वर्षभरात पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘येत्या वर्षभरात पुणे विभागात २०० इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होतील. सध्या पुणे विभागात ६६ इलेक्ट्रिक बस आहेत. या बसचे चार्जिंग शंकरशेठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी होते. अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे किंवा चार्जिंगसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने बसचे वेळापत्रक कोलमडते व प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांमध्ये ‘चार्जिंग स्टेशन’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे पुणे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले.

आणखी वाचा-महापालिका करणार ११ हजार विद्यार्थ्यांना सहाय्य, काय आहे कारण?

‘स्वारगेट आणि दापोडी येथे ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्यासाठी आवश्यक परवानग्यादेखील घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर सात ते आठ बस चार्ज होतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, येत्या दोन दिवसांत नव्याने १५ बस ताफ्यात दाखल होणार असल्याने ‘चार्जिंग स्टेशन’वर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, वर्षभरात इतर बस टप्प्याटप्प्याने जरी दाखल होणार असल्या, तरी हा ताण वाढत जाणार असल्याने स्वारगेट आणि दापोडी येथील ‘चार्जिंग स्टेशन’वरील बस चार्ज करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक ‘चार्जिंग स्टेशन’वर एका वेळी १८ बस चार्ज होतील, अशा पद्धतीने ३६ चार्जिंग केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. या बदलाला मान्यता मिळाली असून, उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी महावितरण कंपनीला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक परवानग्या प्राप्त करून लवकरच विद्युतपुरवठाही सुरू करण्यात येईल,’ असेही त्यांनी नमूद केले.

पुणे विभागांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर मार्गांवर ई-शिवाई सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. सोलापूर मार्गावरून धावणाऱ्या बस शंकरशेठ रस्त्यावरील चार्जिंग स्टेशनवर, कोल्हापूर, सातारा सांगली मार्गावरून येणाऱ्या बस स्वारगेट येथील ‘चार्जिंग स्टेशन’ येथे चार्ज होतील, तर नाशिक, धुळे, तसेच उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या बस दापोडी येथील ‘चार्जिंग स्टेशन’मध्ये चार्ज होतील. त्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात येत आहे.

आणखी वाचा-पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित

  • पुणे विभागात एकूण बस : ९५०
  • येत्या वर्षभरात मोडीत काढल्या जाणाऱ्या बस : ८५
  • इलेक्ट्रिक बसची संख्या : ६६
  • दोन दिवसांत दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बस : १५
  • सद्यास्थितीत शंकरशेठ रस्ता येथेच एक ‘चार्जिंग स्टेशन’
  • स्वारगेट आणि दापोडी येथे प्रत्येकी एक असे ‘चार्जिंग स्टेशन’ होणार
  • एका ‘स्टेशन’वर १८ अशा एकूण ३६ बस चार्ज होणार
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Capacity of 200 e bus charging stations in the st fleet will also increase in one year pune print news vvp 08 mrj