सध्या लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक लाल महालला भेट देण्यासाठी दररोज येत असतांनाही काही कारणांनी पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. असं असतांना दुसरीकडे याच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारीत रिल्सचे शुटिंगचे करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावर शिवप्रेमी संघटेनेने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून त्याची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याप्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केलं आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.

“जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे. या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसापूर्वी पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. मात्र आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत” अशी मागणी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना केली होती. या मागणीनंतर पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतलाय. त्यामुळे वैष्णवी पाटील यांच्यासहीत त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against vaishnavi patil for shooting reels in lal mahal pune print news scsg
First published on: 21-05-2022 at 13:15 IST