पिंपरी : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या फायबर ऑप्टिकल ‘डक्ट’मध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सहा दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूरसंचार विभागाला सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे.
रमेश शिवाजी पाटील (वय ४६, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यासह बीएसएनएल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हे दूरसंचार विभागाला सुविधा पुरवितात. निगडीतील बीएसएनएल कंपनीच्या बंद असलेल्या ‘डक्ट’मधून नवीन ‘ओएलटीई’ बसवण्यासाठी ऑप्टिकल फायबर ठिकाण काढण्याचे काम करतात. हे काम करताना कामगारांना मास्क, हातमोजे, गमबूट आणि श्वसनास त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवणे गरजेचे होते. मात्र, याची जाणीव असतानाही रमेशने ही साधने पुरविली नाहीत. अकुशल कामगारांना काम करण्यास पाठवले. काम करत असताना दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे, लखन उर्फ संदीप आशरुबा धावरे आणि साहेबराव संभाजी गिरशेट या तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी
ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपायुक्त संदीप खोत, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांचा समावेश आहे. समितीने घटनेचे कारण, पार्श्वभूमी तपासावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांसह दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.
याप्रकरणी ठेकेदाराला अटक केली आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. बीएसएनएलच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. -महेश बनसोडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निगडी