पुणे : आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना सीबीआयकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. दिवसभर केलेल्या छापेमारीत सीबीआयने सहा कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली. रामोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या निवास आणि कार्यालयात करोडो रुपये; पोलिसांनी मागवली पैसे मोजण्याची मशिन

सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा जास्त मोबदला मिळणार असल्याने रामोड यांनी पैशाची मागणी तक्रारदार यांच्या पक्षकाराकडे केली होती. पैसे न दिल्याने रामोड यांनी तक्रारदारांच्या पक्षकारांची जमिनीच्या मोबदल्याची प्रकरणे प्रलंबित ठेवली होती. रामोड यांनी तक्रारदाराकडे वाढीव नुकसानभरपाईच्या दहा टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. सुमारे सव्वा कोटी रुपये वाढीव भरपाईसाठी तक्रारदाराकडून दहा लाख आणि तडजोडीनंतर आठ लाख रुपये घेण्याचे ठरविले.

हेही वाचा >>> गोव्यातील ‘कॅसिनो’त हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या; दोन तरुणींविरुद्ध गुन्हा

तक्रारदाराने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयने सापळा रचून रामोडला आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुण्यातील तीन ठिकाणी रामोड यांच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये सहा कोटी रुपये ; स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे ; गुंतवणूक आणि बँक खाते तपशील आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले. रामोड यांना शनिवारी शिवाजीनगर  न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi arrest additional divisional commissioner anil ramod for accepting bribe pune print news psg 17 zws
First published on: 10-06-2023 at 00:08 IST