औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्यास ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यावरून बरेच ‘राजकारण’ ही झाले. अखेर, चाकणसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली. या नवनिर्मित नगरपरिषदेची पहिली निवडणूक रविवारी (१ नोव्हेंबर) होत आहे. शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते या निमित्ताने पुन्हा ‘आमने-सामने’ आले असून दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
औद्योगिक क्षेत्रात महत्त्व वाढलेल्या चाकणसाठी अजूनही ग्रामपंचायतच होती. पिंपरी पालिकेच्या हद्दवाढीसाठी लगतची २० गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे ठरले, त्यात चाकणचाही समावेश होता. मात्र, पिंपरी पालिकेत येण्यास चाकणकर नेत्यांनी एकमुखी विरोध केला. त्यामुळे हा विषय बारगळला. पुढे, चाकणसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापनेचा निर्णय शासनाने घेतला. ६ एप्रिल २०१५ मध्ये स्थापन झालेल्या चाकण नगरपरिषदेचे क्षेत्र १७ चौरस किलोमीटर आहे. नगरपरिषदेच्या एकूण २३ जागा आहेत, त्यापैकी २२ जागांवर रविवारी निवडणूक होत आहे. एके ठिकाणी उमेदवाराचे निधन झाल्याने त्या जागेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. एकूण ४१ हजार ११३ मतदार २२ जणांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. खेड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आतापर्यंत ‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ असाच सामना रंगला आहे. चाकण नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्ष ‘आमने-सामने’ आले आहेत. दहा वर्षे आमदार असलेल्या दिलीप मोहिते यांचा गेल्या विधानसभेत शिवसेनेच्या सुरेश गोरे यांच्याकडून पराभव झाला. आता याच दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रात व राज्यातील भाजप सरकारने वर्षभरात काहीच केले नाही. नुसतीच आश्वासने देणारे आमदार गोरेही निष्क्रिय ठरल्याचा मुद्दा मोहिते यांच्याकडून मांडला जात आहे. मोहिते यांचे आरोप फेटाळत सत्ता शिवसेनेकडेच राहणार असल्याचा विश्वास आमदार गोरे व्यक्त करत आहेत. कचरा व पाण्यासह जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2015 रोजी प्रकाशित
नवनिर्मित चाकण नगरपरिषदेच्या २२ जागांसाठी रविवारी निवडणूक
‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ असाच सामना रंगला आहे. चाकण नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्ष ‘आमने-सामने’ आले आहेत
First published on: 30-10-2015 at 03:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakan municipal election