पिंपरी- चिंचवड: चाकण पोलिसांनी दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. अशोक मधुकर सोनवणे हा बनावट चावीने दुचाकीच लॉक काढून दुचाकी लंपास करायचा. अशोक सोनवणे याच्याकडून चाकण पोलिसांनी तब्बल ८ लाखांच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात दुचाकी चोरण्याच प्रमाण वाढलं होत. पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजवरून सराईत अशोक सोनवणेचा शोध घेण्यात आला.
त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने चाकण परिसरातील १५ दुचाकी चोरल्याच निदर्शनास आणले. सोनवणे हा दुचाकी कमी किमतीत विकत असायचा. वडगाव मावळ, पुणे ग्रामीण आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात देखील सोनवणे याच्यावर दुचाकी चोरल्याच उघड झाल आहे.
इमारतीच्या पार्किंगमधील किंवा रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी बनावट चावीच्या आधारे अशोक सोनवणे हा दुचाकी लंपास करायचा. दुचाकीचा आवाज येऊ नये म्हणून बंद दुचाकी लांब घेऊन जाऊन सुरू करून पसार व्हायचा. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली आहे.