पिंपरी- चिंचवड : चाकण बलात्कार प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहेत. २७ वर्षीय महिला कामावर जात असताना आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे याने तोंड दाबून आडोशाला नेऊन बळजबरी करून बलात्कार केला होता. ही घटना मंगळवारी रात्री पावणे बारा च्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी, पीडित २७ वर्षीय महिला मंगळवारी रात्री रात्रपाळी नोकरीवर जात होती. महिलेचा पिअप पॉईंट हा १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर होता. पीडित महिला एकटीच चालत जात होती. हे हेरून आरोपी नराधम प्रकाश ने महिलेला गाठलं. जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेला बळजबरी आडोशाला घेऊन गेला. महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेला दोन युवक रस्त्याने जात असल्याच दिसताच तिने आरडाओरडा केला. हे बघून नराधम तिथून पळून गेला. युवक ही घाबरून पळून गेले. महिला काही अंतरावर चालत गेली, तिथं महिला आणि पुरुष दिसले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांना तात्काळ फोन करून सर्व माहिती दिली. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व सविस्तर माहिती घेण्यात आली.

पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनेचं गांभीर्य ओळखून सहा विशेष पथक तयार करण्यात आली. शंभर पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. अखेर आज बुधवारी संध्याकाळी नऊ च्या सुमारास लपून बसलेल्या आरोपी प्रकाश ला चाकण मधील मेदनकरवाडी मधून बेड्या ठोकल्या. पोलिस तांत्रिक तपास करून आरोपीपर्यंत पोहचले. प्रकाश तुकाराम भांगरे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील राहणार आहे. तो देखील चाकण मधील खासगी कंपनीत काम करतो.