Chandni Chowk flyover destroyed by explosion Transportation Closed pune print news ysh 95 | Loksatta

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच

पाडणार, पाडणार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता वाजता मर्यादित स्फोट घडवून काही क्षणांतच जमीनदोस्त करण्यात आला.

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच
चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त

सकाळी आठपर्यंत चांदणी चौक परिसरात संचारबंदी

पुणे : पाडणार, पाडणार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता वाजता मर्यादित स्फोट घडवून काही क्षणांतच जमीनदोस्त करण्यात आला. पूल पाडण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि तांत्रिक पथकाकाडून मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून तयारी करण्यात येत होती. पाडलेल्या पुलाचा राडारोडा हटिवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौक आणि परिसरात सकाळी आठवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्फोट घडवून पाडण्यात आलेला पुण्यातील हा पहिलाच पूल असल्याने नागरिकांमध्येही त्याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त; रस्ता खुला होण्यास उशीर, वाहनांच्या लांब रांगा

महामार्गावरील चांदणी चौकात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टीने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कमी वेळेत पूल पाडून त्याचा राडारोडा जमा करणे आणि वाहतूक कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोची आणि नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. याच कंपनीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याचे काम केले आहे. कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला पुलाची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर स्फोटके भरण्यासाठी छिद्रे पाडण्यात आली. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली. त्यापूर्वी शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या परिसराची हवाई पाहणी केली.

हेही वाचा >>> नवरात्रोत्सवात नारळांना मागणी; दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक

पूल पाडण्यासाठी सुमारे सहाशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. तांत्रिक रचनेनुसार घेतलेल्या १५०० हजार छिद्रांमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून तांत्रिक पथकाकडून पूल पाडण्याच्या कामाची अंतिम तयारी करण्यात येत होती. शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली.  मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथूनच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्री उशिरा चांदणी चौकाच्या परिसरातील सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला. स्फोटाच्या परिसरात ठरावीक जबाबदार अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच केवळ काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.

असा पाडला उड्डाणपूल…

पूल पाडण्यासाठी रात्री आठपासूनच शेवटची तांत्रिक कामे सुरू करण्यात आली होती. स्फोटानंतर राडाराडा बाहेर उडू नये, यासाठी संपूर्ण पुलाला अच्छादित करण्यात आले. आतील भागामध्ये स्फोटाची तीव्रता कमी करण्यासाठी वाळूच्या गोण्या आणि स्पंचचा वापर करण्यात आला. रात्री अकराच्या सुमारास या भागातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. पूल पाडण्याच्या कामात प्रत्यक्षात सहभागी असणाऱ्या मोजक्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना वगळता या भागात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. रात्री बाराच्या सुमारास स्फोटकांच्या वाहिन्या मुख्य सर्किटला जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. पूल पडण्याच्या शेवटच्या टप्प्यात सुमारे ४०० पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत सर्वांना बाहेर काढले. त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली. शेवटी दहा आकड्यांची उलटी गणना सुरू करण्यात आली आणि दहापासून ऐक म्हणताच काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला ३० मीटरचा हा पूल इतिहासजमा झाला. संपूर्ण पूल जमीनदोस्त होण्यास मात्र काही कालावधी लागला.

पूल पाडण्यासाठी अवाढव्य यंत्रणा…

चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. १ हजार ३५० डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर वापरण्यात येत आहेत. पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी एनएचएआयतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. १ हजार ३५० डिटोनेटरच्या वापरातून हा नियंत्रित स्फोट करण्यात आला. पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता.

मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा कोंडीत अडकल्यामुळे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याकडून साताऱ्याकडे जात असताना २७ ऑगस्टला त्यांचा ताफा चांदणी चौकातील परिसरातच वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता. त्यामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील या टप्प्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शिंदे साताऱ्याहून पुन्हा मुंबईकडे परतत असताना ते या भागात थांबले आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि पाहणी केली. येथील वाहतूक कोंडींचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही संबंधित ठिकाणी भेट दिल्यानंतर चांदणी चौकात महामार्गावरून जाणारा उड्डाणपूल पाडण्याचे निश्चित करण्यात आले.

वाहतुकीतील बदल

– मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात आली आहे.

– साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे.

– महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

– महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरिता…

– मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

– वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरून विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडुजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे-सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

– राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडुजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे-सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरिता…

– खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

– खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

– खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“काम नाही, धाम नाही, घरी जा बायको…” मंत्री चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावलं, VIDEO व्हायरल

संबंधित बातम्या

पुण्याच्या कात्रजमध्ये मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण; मोटारचालक अटकेत
पुणे:राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे!
शहरबात पिंपरी : राष्ट्रवादीतील मरगळ दूर करण्याचा निर्धार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Akshaya Hardeek Wedding Live : ‘आली लग्नघटी समीप..” अक्षया देवधर हार्दिक जोशी अडकणार विवाहबंधनात
विश्लेषण: ‘Gaslighting’ ठरला Word Of The Year! अर्थ वाचून नक्कीच श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण येईल
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला