निवडणुकीच्या आणि दिवाळीच्या धामधुमीत राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याला दिलासा देण्याची शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या भिवरी येथील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत आदी उपस्थित होते. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतजमिनीचे, फळबागांचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे,” अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रविवारी अकोला जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आता निवडणुका झाल्या असून, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं जाणार आहे. जिथे सरकारी यंत्रणा पोहचू शकत नाही, तिथेही मदत करणार आहे. त्यामुळे फोटो असला तरी पंचनामा समजून मदत केली जाईल. ज्यांचं नुकसानं झालं त्यांना मिळाली पाहिजे ही भूमिका असून अधिकाऱ्यांनी कोणत्याही निर्देशांची वाट न बघता सहा नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कामाला लागा,” असे आदेश देत “शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भानं सरकारी आणि खाजगी कंपन्यांशी चर्चा करेल,” असं फडणवीस म्हणाले होते.
