जलजीवन मिशन योजना सध्या ज्या गावात अस्तित्वात आहे मात्र निकषानुसार पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तेथे नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमता वाढ करण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी केली.

हेही वाचा >>>‘पुण्यात राज्य पोलीस क्रीडा प्रशिक्षण संस्था उभारणार’; पोलीस महासंचालकांची घोषणा

जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनांच्या कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी घेतला. जलजीवन मिशनची कामे गतीने आणि पारदर्शीपणे पूर्ण करावीत, अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली. आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, उप कार्यकारी अभियंता अमित आडे या वेळी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सादरीकरण करून योजनेच्या प्रगतीची माहिती दिली.

हेही वाचा >>>पुणे: नवा बासमती बाजारात दाखल; खरेदीसाठी व्यापारी थेट बांधावर

सन २०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाचे पाणी असेल यासाठी नियोजनबद्ध काम करावे. जिल्हा दर सूचीच्या (डीएसआर) दरात वाढ झालेली असल्यामुळे त्यानुसार योजनांसाठी निविदा जाहीर केलेल्या असल्यास निविदेच्या रकमेपेक्षा अधिक दराने निविदा नसाव्यात. ज्या गावात सध्या योजना अस्तित्वात असलेल्या योजना निकषानुसार पाणी पुरविण्यासाठी पुरेशा नाहीत तेथे आवश्यक ती तपासणी करून नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमतावाढ करण्यावर भर द्यावा. योजनांचे काम आराखड्यानुसार आणि निकषानुसार सुरू आहे का, याची बारकाईने तपासणी करावी. योजनांसाठी शासकीय जागा आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून आढावा घेऊन मार्ग काढावा, अशी सूचना पाटील यांनी या वेळी केली.