पुणे : ‘शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी सर्वंकष आराखडा तयार करून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी,’ अशा सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या खात्याशी संबंधित विविध विकासकामांसंदर्भातील आढावा बैठक झाली, त्या वेळी पाटील बोलत होते. बैठकीला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘आगामी काळात पुणे शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा होणार आहे. यासाठी आवश्यक दर्जाचे रस्ते तयार करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे. विविध विधानसभा मतदारसंघांतील खड्डे बुजविल्याचा अहवाल सर्व आमदारांना नियमितपणे उपलब्ध करून द्यावा. रस्ते विकासाचा सर्वंकष आराखडा प्रशासनाने तयार करावा.’
‘रस्ते विकास आणि महावितरणशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा,’ असे आदेश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बैठकीत दिले.
‘पीएमपीच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या एक हजार बसच्या देखभाल-दुरुस्तीसह आर्थिक नियोजन करावे. पीएमपीला होणारा आर्थिक तोटा दोन्ही महापालिका भरून काढतात. आता पीएमपीने महापालिकांवर अवलंबून न राहता आर्थिक सक्षम झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, वेतनातील फरक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याचे नियोजन प्रशासनाने करावे,’ असेही मिसाळ म्हणाल्या.