पुणे : कामावर जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध हडपसर पोलिसांनी २४ तासांत आरोपपत्र दाखल केले. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुणीला आरोपी त्रास देत होता. तो तरुणीला त्याच्याबरोबर राहण्यासाठी आग्रह करत होता. ती कामावरुन ये-जा करत असताना तो तिचा पाठलाग करायचा. तिला अडवून तिच्यासोबत असभ्य वर्तन करत होता. आरोपीच्या त्रासामुळे तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित या प्रकरणात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर पाेलिसांनी तरुणीचा जबाब भारतीय न्याय संहितेतील कलम १८३ अन्वये नोंदविला. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले, तसेच आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. गुन्ह्याच्या तपासात ई-साक्ष प्रणालीद्वारे पुरावे संकलित करण्यात आले. पुरावे, तसेच जबाबासह पोलिसांनी लष्कर न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, विनोद शिर्के यांनी ही कामगिरी केली.
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
विवाहच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख झाली होती. विवाहाचे आमिष दाखवून त्याने तरुणीाला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्याने विवाहास नकार दिला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. विवाहाच्या आमिषाने एका युवतीला पळवून ने्लयाची घटना उघडकीस आली आहे. याबाबत युवतीच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.
दरम्यान,भारती विद्यापीठ परिसरातील एका युवतीला आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत युवतीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तपास करत आहेत.