पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचा बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुका येथे डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली.

डॉ. नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. ‘आयुका’तील भास्कर सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून डॉ. नारळीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच, डॉ. नारळीकर यांच्या कन्या डॉ. गिरीजा आणि डॉ. लीलावती यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा या वेळी उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यातील विविध वैज्ञानिक संस्थांतील शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थ्यांनीही डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘आयुका’मध्ये गर्दी केली होती.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे, ‘आयुका’चे संचालक डॉ. आर. श्रीआनंद, माजी संचालक डॉ. सोमक रायचौधुरी, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, रवींद्र शिंगणापूरकर आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.