* पंकजा मुंडे यांच्याकडून नामदेवशास्त्रींना दिलेली धमकी चुकीचीच
* आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर झालेला लाठीमार अन्यायकारक
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि चुकीचे वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतात. महसूलमंत्री एकनाथ खडसे वगळता इतर मंत्र्यांचे त्यांनी राजीनामे घेतले नाहीत. सार्वजनिक प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये, सुडाची भाषा वापरू नये. महाराष्ट्रात जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, ती दूर करावी, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवडला पत्रकारांशी बोलताना केली. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांना महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेली धमकी चुकीची असून ती भाषा मंत्र्यांना शोभत नाही, असेही ते म्हणाले. भावी पिढी घडवणारे शिक्षक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढतात, त्यावर झालेला बेछूट लाठीमार अन्यायकारक होता, अशी टिप्पणीही पवारांनी केली.
पवार म्हणाले, विरोधकांच्या कुंडल्या काढण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा काय सांगते. त्यांनी काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. कोणाच्या चुका होत असतील तर कारवाई जरूर करावी. मात्र, राजकीय हेतू ठेवून त्रास देऊ नये. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार अशी थोर व्यक्तिमत्त्व असलेल्या मुख्यमंत्र्यांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. त्यांनी कधीही अशाप्रकारची विधाने केली नाहीत.
मात्र, सध्याचे मुख्यमंत्री ते पाळताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एका पक्षाचे नसतात. सार्वजनिक प्रश्न सोडवताना त्यांनी राजकारण आणू नये. मुंडे-नामदेवशास्त्री यांच्या वादाविषयी बोलताना पवार म्हणाले, मुंडे महत्त्वाच्या मंत्री आहेत. त्यांनी महंतांना ज्याप्रकारे धमकी दिली, ते चुकीचेच आहे. महाराष्ट्रातील जनता अशा गोष्टी खपवून घेणार नाही.
आम्ही लोकांना मारहाण करतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आणि तडीपारी करायला लावतो, ही भाषा मंत्र्यांना शोभत नाही. सरकारमध्ये खदखद आहे. भाजपच्या शिबिरात पंकजा मुंडे मराठा आरक्षणाचा ठराव मांडणार होत्या. मात्र, त्या गैरहजर राहिल्याने चंद्रकांत पाटील यांना ठराव मांडावा लागला आणि पक्षाचे हसू झाले. आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष करणारच, ते त्यांचे कामच आहे. मात्र, मुख्यमंत्री अशा मंत्र्यांना पाठीशी घालतात.
खडसे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी लगेचच घेतला. इतरांच्या बाबतीत वेळ मारून नेण्याचे काम ते करत आहेत. जनता हुशार आहे, त्यांना या सर्व गोष्टी कळत असतात.
पिंपरीत १०७ मीटर उंच राष्ट्रध्वज
सतत डौलाने फडकत राहील आणि देशातील सर्वात उंच ठरेल, असा भारताचा राष्ट्रध्वज िपपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी चिंचवड येथे केली. सध्या वाघा बॉर्डर येथे १०५ मीटर उंच ध्वज आहे. नवी मुंबई येथे ९२ मीटर उंच राष्ट्रध्वज आहे. तथापि, िपपरीतील राष्ट्रध्वज १०७ मीटर उंच असेल, असे पवार यांनी यावेळी सांगितले.