चांदणी चौक परिसरातील जुना उड्डाणपूल २ ऑक्टोबरला मध्यरात्री स्फोटकांनी पाडण्यात येणार आहे. वाहतूक बंद ठेवून २०० मीटर परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, पुलापासून काही अंतरावर किंवा १०० ते २०० मीटरच्या परिघात असलेल्या इमारतींचे मालक किवा सोसायट्यांमधील रहिवाशांना प्रशासनाकडून अद्याप पूल पाडताना निर्माण होणारी संभाव्य स्थिती आणि दक्षतेबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेला नाहीत. त्यातून पूल पाडण्याआधी या भागात संभ्रमांचे ‘स्फोट’ होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना योग्य ती माहिती पुरवावी, अशी मागणी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- तीन वर्षांत राज्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालये शासकीय जागेत; जागा शोधण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. प्रशासनाकडून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटके वापरण्यात येणार आहेत. २ ऑक्टोबरला मध्यरात्री स्फोट घडवून पूल पाडण्यात येणार आहे. केवळ पाच ते सहा सेकंदात हा पूल जमीनदोस्त होणार आहे. चांदणी चौकातून सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत दररोज तब्बल तीन लाख दहा हजार वाहने प्रवास करतात. पूल पाडल्यानंतर राडारोडा काढून रस्ता मोकळा करण्यात येणार असून, रात्री ११ ते रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियोजनही प्रशासनाने केले असून, स्फोटाच्या कालावधीत २०० मीटरपर्यंतचा भाग निर्मनुष्य केला जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, याबाबत पुलाजवळच्या भागातील सोसायट्या आणि इमारतीतील नागरिकांना दक्षतेबाबत अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.

हेही वाचा- पुणे जिल्हा नियोजन समितीवरील १८ सदस्यांचे पद रद्द

पूल पाडण्याच्या स्फोटाबाबत आणि नागरिकांनी घेण्याच्या दक्षतेबाबत स्थानिकांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी राज्य वाहतूकदार प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. शिंदे यांनी याबाबत सांगितले, की पूल पाडण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. पुलापासून १०० ते २०० मीटरच्या भागात मेघ मल्हार, झिनिया, अल्फा, शिवपदम, प्रथमेश, सुमिधा आदी मोठ्या सोसायट्या आहेत. माझ्याही हॉटेलची इमारत पुलापासून काही अंतरावर आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप आम्हाला दक्षतेबाबत किंवा स्फोटाच्या होणाऱ्या किंवा न होणाऱ्या परिणामांबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुरविलेली नाही. प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनाही याबाबत पत्र दिले आहे. परंतु, त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही.

हेही वाचा- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी; पुण्यात संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ

चांदणी पूल स्फोट घडवून पाडण्यात येणार असल्याने पुलापासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षेबाबत विविध प्रश्न आहेत. अशा स्फोटाचा आम्हाला पूर्वानुभव नाही. पूल पाडणार असल्याच्या रात्री आम्ही नेमकी काय दक्षता घ्यायची. त्याचा आम्हाला काही धोका आहे किंवा नाही, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात न आल्याने नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम असल्याचे मत शिवपदम को. हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष नितीन देवरे यांनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion among the locals even before the demolition of the flyover at chandni chowk pune print news dpj
First published on: 29-09-2022 at 10:46 IST