पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२३-२४) राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटीच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांना महत्त्व देण्याबाबत विचार करण्याचे जूनमध्ये तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या संदर्भात शासन निर्णय किंवा परिपत्रक प्रसिद्ध झालेले नसल्याने पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) घेतल्या जातात. त्यातही अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषि अभ्यासक्रमासाठीच्या एमएचटी-सीईटीला लाखो विद्यार्थी अर्ज भरतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीतील गुणांवरच होत असल्याने विद्यार्थी बारावीकडे अभ्यासक्रमाकडे आणि परीक्षेला महत्त्व देत नाहीत. सीईटीतील गुण उंचावण्यासाठी खासगी शिकवणी वर्ग लावले जातात. या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षेचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी बारावीचे गुण आणि सीईटीच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांना महत्त्व देण्याबाबत विचार सुरू असल्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले होते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतही त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा – पुणे : शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती, ३७ जणांना अटक; २७ कोयत्यांसह शस्त्रसाठा जप्त

राज्यात सत्तांतर झाल्यावर सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाऐवजी उद्योग विभाग सोपवण्यात आला. त्यामुळे मंत्री बदलल्यावर सीईटी आणि बारावीच्या गुणांचा विषय मागे पडल्याचे दिसून येते. या विषयाबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सीईटी सेल यांच्याकडून परिपत्रक, शासन निर्णय काहीच प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ‘सामंत यांनी घोषणा केल्यानंतर पुढे काहीच स्पष्टता न आल्याने द्विधा मनस्थिती झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जास्त महत्त्व द्यायचे की सीईटीच्या अभ्यासावर भर द्यायचा हे कळत नाही. बारावी आणि सीईटीला समान महत्त्व देण्याचा निर्णय किमान एक वर्ष आधी झाल्यास विद्यार्थ्यांना तयारीला पुरेसा वेळ मिळेल. आता शासनाने अचानक निर्णय घेतल्यास ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही,’ असे एका पालकाने सांगितले.

हेही वाचा – पुणे : शरद पवार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या एकाच व्यासपीठावर?

सीईटी आणि बारावीच्या गुणांना समान महत्त्व देण्याबाबत आतापर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, हा महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळे, या विषयाबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over equal importance of cet 12th marks no movement at maharashtra goverment level pune print news ccp14 ssb