राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांचा प्रचार करायला काँग्रेसचा स्पष्ट नकार

चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारांचा प्रचार करण्यास काँग्रेसने स्पष्टपणे नकार दिला आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी तसे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने मात्र राष्ट्रवादीच्या सोबत राहण्याचा पवित्रा घेतल्याने काँग्रेसची गटबाजीही उघड झाली आहे.

भोसरी आणि चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाहीत. भोसरीत लांडे आणि चिंचवडला कलाटे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी अशा पुरस्कृतांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका यापूर्वीच घेतली. तेव्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिब्याच्या निर्णयाचे समर्थन केले. राष्ट्रवादीच्या वाटणीला आलेल्या मतदार संघात काय करायचे, हा आमचा अधिकार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

या पाश्र्वभूमीवर, काँग्रेस शहराध्यक्ष साठे यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन राष्ट्रवादी पुरस्कृत दोन्हीही उमेदवारांचा प्रचार काँग्रेस करणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, पिंपरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. पुरस्कृतांच्या बाबतीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करता अजित पवारांनी परस्पर घोषणा केली, यावरून साठे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेस शहराध्यक्षांनी ही भूमिका घेतली असतानाच पक्षातील त्यांच्या विरोधी गटाने मात्र पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. जातीयवादी पक्षांना मदत होईल, अशी कोणतीही कृती आम्ही करणार नसल्याचे त्यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून कलाटे पुरस्कृत

चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नगरसेवक राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केले आहे. आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्राद्वारे कलाटे यांना पाठिबा जाहीर केला आहे.