सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात पोलीस संरक्षण घेतलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाने तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. गोळीबारात तरुण जखमी झाला असून सिंहगड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने घबराट उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश राठोड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक संतोष पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिवाला धोका असल्याने त्याने पोलीस संरक्षण घेतले आहे.

हेही वाचा – गणेश जयंतीनिमित्त उद्या पुण्याच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

सनसिटी रस्ता परिसरात श्री योगीराज सर्व्हिस गॅरेज आहे. मंगळवारी (२४ जानेवारी) दुपारी बाराच्या सुमारास संतोष पवार आणि रमेश राठोड गॅरेजवर थांबले होते. पवार आणि राठोड ओळखीचे असून नातेसंबंधातील आहेत. समाजमाध्यमातील संदेशावरून दोघांमध्ये गॅरेजसमोर वाद सुरू झाले. वादावादीचे पर्यवसन धक्काबुक्कीत झाले. त्या वेळी पवारने त्याच्याकडील पिस्तुलातून राठोड याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. राठोड याच्या पायात गोळी शिरल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेतील राठोडला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार याच्याबरोबर असलेल्या अंगरक्षक पोलीस शिपायाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगरक्षकाला न जुमानता पवारने राठोडवर गोळीबार केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा – भालचंद्र नेमाडे, प्रभावळकर रविवारी पुण्यात एकाच व्यासपीठावर, ‘गांधींची सिनेचरित्र गाथा’ पुस्तकाचे प्रकाशन

सिंहगड रस्ता परिसरातील एका गुंड टोळीविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. गुंड टोळीने संतोष पवारला धमकावले होते. पवार याच्या फिर्यादीनुसार गुंड टोळीवर मोक्का कारवाई झाली होती. त्याच्या जिवाला असणारा धोका विचारात घेऊन पोलिसांनी त्याला अंगरक्षक दिला होता. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction businessman gun fire on youth in a dispute over a whatsapp message in pune pune print news rbk 25 ssb