पुणे : दीड ते दोन महिन्यांपूर्वी तेजीत असलेल्या कोथिंबीर, मेथीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पोषक वातावरणामुळे लागवड वाढली असून, घाऊक बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर, मेथी विक्रीस पाठवली आहे. आवक वाढल्याने कोथिंबीर, मेथीला कवडीमाेल भाव मिळाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री प्रतवारीनुसार चार ते सात रुपये दराने करण्यात येत आहे. मेथीच्या एका जुडीची विक्री चार ते आठ रुपये दराने करण्यात येत असून, मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर, मेथीची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला पाच ते दहा रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात मेथीच्या एका जुडीची विक्री दहा ते वीस रुपये दराने करण्यात येत आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी तरकारी विभागात मेथी आणि कोथिंबिरीची आवक कमी झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दरही चांगले मिळाले होते. पितृपक्षात मेथीला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. पितृपक्षात मेथीच्या एका जुडीला ५० ते ६० रुपये असा दर मिळाला होता.

हेही वाचा – पुणे : नगर रस्त्यावर वायूगळती प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मेथी आणि कोथिंबिरीला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. जादा भाव मिळण्याच्या आशेपोटी लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मागणीच्या तुलनेत मेथी आणि कोथिंबिरीची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. घाऊक बाजारात दररोज साधारणपणे कोथिंबिरीच्या एक ते दीड लाख आणि मेथीच्या ७५ हजार ते एक लाख जुडींची आवक होत आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. कोथिंबीर, मेथीची आवक पुणे, लातूर, जालना जिल्ह्यातून होत आहे. मेथी, कोथिंबिरीसह अन्य पालेभाज्यांना फारसे भाव नसल्याचे सूर्यवंशी यांनी नमूद केले.

मेथी आणि कोथिंबिरीची आवक मागणीच्या तुलनेत जास्त प्रमाणावर होत आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी भाव मिळाल्याने लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांची लागवड वाढली आहे. भाव मिळत नसल्याने वाहतूक, तसेच लागवड खर्च न मिळाल्याने शेतकरी निराशेत आहेत. – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाजी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

हेही वाचा – राज्य सरकार केवळ तोंड वाजविणारे, सरकारी धोरणांवर राज ठाकरे यांची टीका

घाऊक बाजारातील शेकडा जुडीचे भाव

कोथिंबीर – १०० ते ७०० रुपये

मेथी – ३०० ते ७०० रुपये

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coriander fenugreek prices have come down 2 to 7 rupees in the wholesale market pune print news rbk 25 ssb