विद्यार्थी संख्या २५ टक्के कमी होण्याची शक्यता, किमान पाच हजार कोटींचा फटका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिन्मय पाटणकर

करोना संकटामुळे शिक्षणाचे देशातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या पुण्यात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता असून पुण्यातील शिक्षण अर्थसाखळीला किमान पाच हजार कोटींचा फटका बसणार आहे.

शिक्षणासाठी राज्यभरातून, परराज्यातून आणि परदेशातून विद्यार्थी येण्यात अडचणी असल्याने पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाज आहे. या घटणाऱ्या विद्यार्थीसंख्येमुळे अर्थसाखळीला हजारो कोटींचा फटका बसण्याबरोबरच अनेकांचे व्यवसाय धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे आणि परिसरात जवळपास १३ विद्यापीठे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसह परराज्यातील आणि परदेशातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने शिक्षणासाठी येतात. त्याशिवाय स्पर्धा परीक्षा, सनदी लेखापाल, कंपनी सचिव अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही विद्यार्थी पुण्यात येतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या अनुषंगाने मोठी आर्थिक उलाढाल होत असते. शिक्षणसंस्थांतील पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का लक्षात घेता या क्षेत्राशी संबंधित अर्थसाखळी जवळपास सात ते आठ हजार कोटींची आहे. मात्र, करोना संकटामुळे ही अर्थसाखळी कमकुवत होणार आहे.

विद्यार्थ्यांचा घटणारा टक्का आणि अर्थसाखळीवरील परिणामाबाबत ‘एमआयटी एटीडी विद्यापीठा’चे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड म्हणाले, ‘पुण्यात माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नोकरीच्या संधींमुळे जवळपास पाच लाख विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. एमआयटी एटीडी विद्यापीठ आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील ४० ते ५० टक्के विद्यार्थी पुण्याबाहेरचे असतात. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी वगळता बहुसंख्य विद्यार्थ्यांना अन्यत्र व्यवस्था करावी लागते. त्यासाठी दरमहा किमान दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतात. हे लक्षात घेता त्यांचे अर्थसाखळीतील वार्षिक योगदान किमान पाच-सहा हजार कोटींचे आहे. स्वाभाविकच खानावळी, सदनिका भाडय़ाने देणे आदी छोटे व्यवसाय विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत. विद्यार्थीसंख्या घटल्याने सर्व घटकांना मोठा फटका बसणार आहे.’

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनीही करोना संसर्गामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असल्याने अर्थसाखळीला मोठा फटका बसणार असल्याचे मान्य केले. डॉ. साळुंखे म्हणाले, ‘दरवर्षी पुण्याबाहेरून येणारे सुमारे एक ते दीड लाख नवे विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतात. त्यामुळे नवे आणि जुने विद्यार्थी मिळून बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखांच्या घरात आहे. पुण्यातील खासगी आणि अभिमत विद्यापीठांतील विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० टक्के  विद्यार्थी पुण्याबाहेरचे आहेत. या वर्षी किमान पहिले सत्र पूर्णत: ऑनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शहरातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतले, तरी विद्यार्थी प्रत्यक्ष पुण्यात येणार नाहीत. पुणे आणि परिसरातील रोजगारसंधीमुळे विद्यार्थ्यांचा पुण्यात येण्याकडे कल असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांचा महिन्याचा किमान खर्च २० हजार रुपये आहे. त्यामुळे शहराच्या दृष्टीने पाच हजार कोटींपेक्षा जास्त फटका बसणार आहे.’

करोना संसर्गामुळे खासगी महाविद्यालये, स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांचे विद्यार्थी कमी होतील. अनुदानित महाविद्यालयांना फारसा फरक पडणार नाही. पुण्यात येणारे एकूण २५ ते ३० टक्के विद्यार्थी कमी होतील. टाळेबंदीमुळे नोकरदार, व्यावसायिक, निम्न आर्थिक गट यांच्यासमोरील मोठय़ा आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी पुण्यात येण्यापेक्षा जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील खानावळी, हॉटेल, शिकवणी वर्ग यांचे अर्थचक्रावर मोठा परिणाम होईल. करोना संसर्गाचा फटका शिक्षण क्षेत्राशी संबंधित अर्थसाखळीबरोबरच अन्य क्षेत्रांनाही बसणार आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केले.

निवास व्यवस्थेवरील खर्च

बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या वसतिगृहात राहतात. तर, संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी वसतिगृहात, खाट तत्त्वावर किंवा सदनिका भाडय़ाने घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात आणि उपनगरांमध्ये राहावे लागते. गेल्या काही वर्षांत वसतिगृह हे स्वतंत्र उद्योग क्षेत्र म्हणून विकसित झाले असून, अनेक कंपन्यांनी वसतिगृहे सुरू केली आहेत. वायफाय, वातानुकूलित यंत्रणा आदी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी खासगी वसतिगृहे वार्षिक किमान दोन लाख शुल्क घेतात. या संदर्भात असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्सचे अध्यक्ष सचिन शिंघवी म्हणाले, ‘शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही विद्यार्थी मोठय़ा संख्येने राहतात. मध्यवर्ती भागात सदनिकेचे भाडे दरमहा १५ ते २० हजार रुपये, तर उपनगरात आठ ते १५ हजार रुपये आहे. एका सदनिकेत चार ते पाच विद्यार्थी राहतात. वसतिगृहासाठी तीन ते चार हजार रुपये द्यावे लागतात, तर परराज्यातील विद्यार्थी सर्व सुविधांनी युक्त सदनिकेसाठी ३५ हजार रुपयेही भाडे देतात. पुढील काही महिने तरी विद्यार्थी येणार नसल्याने व्यावसायिकांसमोर, खासगी वसतिगृह चालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.’

आकडेवारी

* पुण्याबाहेरून दरवर्षी येणारे विद्यार्थी दीड ते दोन लाख

* पुण्यात शिक्षणासाठी येणारे एकूण विद्यार्थी ५ ते ६ लाख

* परराज्य, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दोन ते अडीच लाख

* राज्यभरातील विद्यार्थी तीन ते चार लाख

* एका विद्यार्थ्यांचा दरमहा सरासरी खर्च दहा ते ३० हजार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona weakens education chain in pune abn