मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आठ महिने फरारी
कोंढव्यातील एका व्यावसायिकाची जमीन बळकाविल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मोक्का)अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार असलेला बापू नायर टोळीतील गुंड नीलेश बसवंत आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडले. कात्रज येथील दत्तनगर भागात गुरुवारी (४ जुलै) ही कारवाई करण्यात आली.
नीलेश श्रीनिवास बसवंत (रा. अप्पर इंदिरानगर) आणि अमित राजाभाऊ जरांडे (वय २९, दोघे रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. यापूर्वी या गुन्ह्य़ात गुंड बापू नायर, अमोल बसवंत व दीपक कदम यांना अटक करण्यात आली होती. मार्केट यार्ड भागातील व्यावसायिक नीलेश बोत्रा यांची कोंढवा येथे जमीन आहे.
गेल्या वर्षी नायर, त्याचे साथीदार बसवंत, कदम, जरांडे यांनी बोत्रा यांना धमकावून बेकायदेशीर रीत्या जमिनीचा ताबा घेतला होता. बोत्रा यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली. तेव्हापासून नायर, कदम, बसवंत, पसार झाले होते. नायरला दिल्लीत पोलिसांनी पकडले. दरम्यान, त्याचे साथीदार पकडले गेले होते.
बसवंत व जरांडे हे पोलिसांना गुंगारा देत होते. नीलेश बसवंत कात्रज भागातील दत्तनगर येथे एका इमारतीत राहत असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून बसवंत व जरांडे याला पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, दिगंबर जाखडे, अमोल पवार, सचिन ढवळे, सतीश भालेकर, कल्पेश बाबर, दीपक मते, असगर सय्यद, प्रदीप गुरव, बाबा नराळे, उज्ज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, प्रणव संकपाळ, गणेश चिंचकर, महेश मंडलिक यांनी ही कारवाई केली.
पुण्यातील व्यावसायिकाला राजस्थानमध्ये अपहरण करुन लुटले
२९ लाखांची खंडणी उकळली
व्यावसायिक कामाच्या बहाण्याने राजस्थानात बोलावून डेक्कन भागातील एका व्यावसायिकाकडून पिस्तुलाच्या धाकाने २९ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक संजीव आगाशे (वय २६, रा. संतोष कुटी, डेक्कन) यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक अभियंता आहेत. त्यांचे शिक्षण इंग्लडमधील नॉटींगहॅम विद्यापीठातून झाले आहे. त्यांचा सेनापती बापट रस्ता परिसरात टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील र्मचट नेव्हीत आहेत. अभिषेक यांना व्यावसायिक कामासाठी जर्मन धातूची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर जाहिरात दिली होती. त्यानंतर मोहित शर्मा असे नाव सांगणाऱ्या एकाने अभिषेक यांच्याशी संपर्क साधला. माझ्याक डे भरपूर प्रमाणात कच्चा माल उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अभिषेकने त्याच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि व्यवहारासाठी राजस्थानात येतो, असे सांगितले. त्यांनी बँकेत पैसे भरण्यास नकार दिला. मोहितने त्यांना राजस्थानातील भरतपूर येथे बोलावून घेतले. त्यानुसार अभिषेक व त्यांचे कार्यालयीन सहकारी बाळकृष्ण पांडुरंग पांडुळे हे गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी विमानाने जयपूर येथे गेले. तेथून ते दोघे जण भरतपूर येथे पोहोचले. मोहितने त्यांना नेण्यासाठी मोटार पाठविली. मोटारीतून त्यांना भरतपूरपासून काही अंतरावर असलेल्या आडरानात नेण्यात आले. त्या वेळी मोटारीच्या मागावर असणारे दोन तरुण दुचाकीवरून पोहोचले. त्यांनी अभिषेक व बाळकृष्ण यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. अभिषेक यांनी पुण्यात संपर्क साधला आणि वडिलांकडून आरटीजीएस सुविधेच्या माध्यमातून २९ लाख रुपये मागवून घेतले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी दोघांना इसा गावातील एका झोपडीत डांबून ठेवले. अभिषेक यांच्या वडिलांनी आरटीजीएसच्या माध्यमातून आगाशे यांनी मोहम्मद व मोहित यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर अपरहणकर्त्यांनी दोघांना सोडून दिले. त्यांना प्रवासासाठी पाच हजार रुपये पुण्याला जाण्यासाठी दिले.
रेल्वे प्रवासात ४९ लाखांचा ऐवज लंपास
सराफांनी दिलेले दागिने पोहोचविण्याचे काम करणाऱ्या एकाकडील रोकड व दागिने असा ४९ लाखांचा ऐवज असलेली बॅग चोरटय़ांनी लंपास केली. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललितकुमार देसाराम माली (वय ३५, रा. कल्याण) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जव्हेरी बाजार येथील एका सराफाने दिलेले दागिने लातूर येथे माळी यांनी पोहोचविले. गुरुवारी रात्री लातूर-मुंबई एक्सप्रेसने ते निघाले. त्यांनी दागिने व १ लाख ८८ हजारांची रोकड असलेली बॅग आसनाखाली ठेवली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे दौंड रेल्वेस्थानकावर आली. त्या वेळी माली झोपेतून जागे झाले आणि आसनाखाली ठेवलेली बॅगेची पाहणी केली. तेव्हा बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुणे रेल्वेस्थानकार गाडी आल्यानंतर माली यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. माली यांच्या बॅगेत सोन्याचे बिस्किट, कर्णफुले असा एक किलो ६०० ग्रॅम ऐवज होता, अशी माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.
कंपनीत भागीदारीच्या आमिषाने ३५ लाखांची फसवणूक
कंपनीत भागीदारी देण्याच्या आमिषाने ३५ लाखांना गंडा घालणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अभिजित रमेश काटकर (वय ३६, रा. यशोपुरम सोसायटी, चिंचवड) आणि महेश व्यवहारे (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आनंदा चंदर काटकर (वय ३४, रा.चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी या संदर्भात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित व महेश याने काही महिन्यांपूर्वी आनंदा काटकर यांच्याकडे त्यांची पवनचक्की बनविण्याची कं पनी असल्याची बतावणी केली होती. कंपनीत भागीदारी देतो, असे आमिष त्यांनी दाखविले होते.
आरोपी काटकर व व्यवहारे यांनी आनंदा यांच्याकडून भागीदाराच्या आमिषाने ३५ लाख रुपये उकळले. भागीदारीसंदर्भातील बनावट कागदपत्रे तयार करून आनंदा यांना दिली.
गेले दोन वर्ष त्यांना परतावा दिला नाही. त्यामुळे त्यांनी दोघा आरोपींकडे विचारणा केली. त्यांनी पैसे परत मागितले.
तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर आनंदा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महाले तपास करत आहेत.
पावणेचार लाखांची रोकड लंपास
टपाल कार्यालयात ठेव म्हणून पावणेचार लाखांची रोकड ठेवण्यासाठी पीएमपी बसमधून निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतील रोकड चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागात गुरुवारी (४ जुलै) सकाळी ही घटना घडली.
वासुदेव चारण (वय ६६, रा. फुरसुंगी) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारण यांच्या वानवडी येथील टपाल कार्यालयात ठेवी आहेत. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते हडपसर येथील गाडीतळ भागातून बसने वानवडीला निघाले होते. त्यांनी पिशवीत ३ लाख ८४ हजारांची रोकड ठेवली होती. चोरटय़ांनी बसमध्ये गर्दी असल्याची संधी साधली आणि चारण यांच्या पिशवीतील ३ लाख ८४ हजार रुपये लांबविले. टपाल कार्यालयात चारण पोहोचले. त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतील रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक बागुल तपास करत आहेत.
