पुणे : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाराज नाहीत. मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या बैठकांना ते उपस्थित होते. या बैठकीवेळी त्यांना अन्य काम असण्याची शक्यता असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला, असे होत नाही,’ असा दावा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे गुरुवारी केला. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमानंतर भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य शासनाने निर्णय केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे नेते, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यातून मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. यासंदर्भात भरणे यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी भुजबळ नाराज नसल्याचा दावा केला. भरणे म्हणाले, ‘भुजबळ नाराज नाहीत. मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या बैठकींना ते हजर होते. मंत्रिमंडळाच्या मुख्य बैठकीवेळी त्यांना काम असल्याने ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला असे म्हणता येणार नाही.’
‘मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर अन्य मागासवर्गीयांसाठीही (ओबीसी) उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीची कार्यप्रणाली अद्याप निश्चित झालेली नसून समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये ओबीसीसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. ओबीसी तसेच मराठा समाजाला सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. या शासन निर्णयामुळे अन्य मागासवर्गीय समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच मराठा समाजालाही योग्य तो न्याय मिळेल.’ असेही भरणे म्हणाले.