पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी एकूण २४ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलांची १४, तर मुलींची १० वसतिगृहे आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील एकूण १३ शासकीय वसतिगृहांपैकी मुलींची ४, मुलांची ८ वसतिगृहे आहेत. तसेच १२ वसतिगृहे तालुकास्तरावर आहेत.
समाज कल्याण आयुक्तांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahait.org संकेतस्थळाद्वारे राबवली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असून, १८ सप्टेंबर रोजी प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.