पुणे : प्रभात रस्त्यावर पादचारी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
जुल्फिकार वहीद शाह (वय ४०, रा. खराडी), नसीम यामीन अन्सारी (वय ४२, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला प्रभात रस्ता भागात राहायला आहेत. त्या १२ ऑक्टोबर रोजी प्रभात रस्त्यावरील १४ व्या गल्लीतून त्या निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरटे शाह आणि अन्सारी यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभात रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चोरटे कोंढवा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसंनी सापळा लावून दोघांना पकडले.
चोरट्यांकडून मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त करण्यात आली. शाह आणि अन्सारी यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाविण्याचे आणकी काही गुन्हे केले आहेत का ?, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाेडे, उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अजय भोसले, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, सागर घाडगे, संजय दंडगुले, संतोष सागर, गणेश सातव यांनी ही कामगिरी केली.