पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती व पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावरील कार्यवाही दोन महिन्यांनंतरही प्रलंबित आहे. याच प्रकरणी वैद्यकीय हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाला बुधवारी पत्र मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता यानंतर ‘ससून’ची समिती नेमली जाईल.
सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेली त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाइकांनी याप्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती देण्यात आली.
उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सोसायटी, चेन्नईचे अध्यक्ष आणि यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला असून, सदस्य सचिवपदी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार आहेत. समितीची बैठक २९ ऑगस्टला दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली होती. त्यानंतर २५ सप्टेंबरला समितीने सह्याद्री रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. त्याच दिवशी समितीची बैठकही झाली. यानंतर या समितीने अहवाल तयार केला. अद्याप या अहवालावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
कोमकर कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयाला सप्टेंबर महिन्यात पत्र पाठवून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. ससून रुग्णालय प्रशासनाने हे पत्र २९ ऑक्टोबरला मिळाल्याचा दावा केला आहे. आता ससूनकडून समिती स्थापन करण्याचे पाऊल उचलण्यात येणार आहे.
उच्चस्तरीय समितीने चौकशी करून अहवाल आरोग्य संचालकांकडे सादर केला आहे. आरोग्य संचालक पुढील आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार असून, यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. – डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा
कोमकर कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी डेक्कन पोलीस ठाण्यात सह्याद्री रुग्णालयाविरोधात तक्रार अर्ज केला होता. त्याआधारे चौकशीसाठी ससून रुग्णालयाला पत्र पाठविण्यात आले. त्यांनी वैद्यकीय अहवालांसह इतर कागदपत्रे मागितली होती. ही कागदपत्रेही ससूनला देण्यात आली आहेत. – गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे</strong>
डेक्कन पोलिसांचे पत्र आणि वैद्यकीय अहवाल ससूनला बुधवारी (२९ ऑक्टोबर) प्राप्त झाले. त्याआधारे आता ससूनमध्ये वैद्यकीय हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. ही समिती या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करील. – डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय
