पुणे : ‘पदवीच्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि रोजगारात तितकी मागणी नसते. त्यांना प्रशिक्षण बंधनकारक केले जाते. ‘एटीकेटी’ आणि इतर पळवाटांचा फायदा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. गुणवत्ता असलेले विद्यार्थी घडवण्यासाठी ‘एटीकेटी’ सारखे नियम आणि अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत ‘शिक्षण प्रसारक मंडळी’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘वेध अस्वस्थ मनाचा’ या उपक्रमांतर्गत ‘पुणे विद्येचे माहेरघर’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जैन बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे, मिलिंद लडगे परिसंवादात सहभागी झाले होते. आयोजक पराग ठाकूर, शिरीष मोहिते, उदय जगताप या वेळी उपस्थित होते. यावेळी दिलीप विश्वकर्मा, अजय आबा पाटील, मिलिंद लडगे, डॉ. धर्मराज साठे यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत सन्मानित करण्यात आले.
जैन म्हणाले,‘पूर्वी शिक्षण घेऊन गुणवत्ता असलेले विद्यार्थी घडत. पहिल्या वर्षाला उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होती. तेव्हा शिक्षण संस्थांना पुढच्या वर्गात मिळणाऱ्या शुल्काची काळजी नव्हती. त्यामध्ये बदल करून विद्यार्थ्यांना चांगल्या कामांमध्ये गुंतून ठेवणे, त्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
डॉ. काळकर म्हणाले, ‘पुण्यात इतर राज्यांतून आणि विदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. बहुतांश संस्था त्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देतात. त्यात मिळणाऱ्या सुविधा, सवलती यांकडेच पालकांचे अधिक लक्ष असते. शिक्षणाच्या निवडीत संस्थांऐवजी शिक्षकांचे महत्त्व अधिक असेल तेव्हाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे नव्याने वाटचाल करता येईल.’ ‘पाच परदेशी विद्यापीठांना मुंबईत शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी कोणतीही अट, नियम न ठेवता परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे पुण्याची शिक्षणाचे माहेरघर म्हणून असलेली ओळख पुसट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ असे डॉ. चिटणीस यांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांना योग्य वयात चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. पालक आणि शिक्षण संस्थांची ही जबाबदारी आहे. शिक्षणाची आणि त्यावर पालकांच्या होणाऱ्या खर्चाची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे आहे.’ असे मत प्रा. चाटे यांनी व्यक्त केले. मिलिंद लडगे म्हणाले, ‘पालकांच्या पैशांवर चैन करणे हा चंगळवाद वाढतो आहे. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे मुलांचे लक्ष जात आहे, ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.’
शहर ही केवळ वास्तू नसते. त्या शहराची एक ओळख, एक व्यवस्था असते. एखादी संस्था शहराबाहेर गेली तरीही पुण्याची ओळख पुसली जाणार नाही. शहरात असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वामुळे पुणे हेच शिक्षणाचे माहेरघर असेल. ती ओळख टिकवण्यासाठी सर्व शिक्षण संस्थांनी प्रयत्न करायला हवेत.डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ