पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील १५ दिवसांत १३ जणांना डेंग्यूची लागण झाली असून एकूण रुग्णसंख्या ६२ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २८ रुग्ण आढळले. मलेरियाचे ३० रुग्ण असून चिकनगुनियाची ४९ जणांना लागण झाली आहे. डेंग्यू, मलेरियासारखे कीटकजन्य आजार रोखण्यासाठी दहा लाख घरांची तपासणी करण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले.

पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये जून महिन्यात दोन, जुलै महिन्यात १९ आणि ऑगस्ट महिन्यात २८ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत १२ हजार २५६ तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या ३०५ संशयित रुग्णांपैकी १३ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. मलेरियाचा एक रुग्ण आढळला आहे. मलेरियाच्या सकारात्मक रुग्णांची एकूण संख्या ३० वर पोहोचली आहे.

४० लाखांचा दंड वसूल

कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक जूनपासून नऊ लाख ८० हजार ३८० घरे तपासली. ५१ लाख ८४ हजार ९७२ कंटेनर, दोन हजार ११ भंगार दुकाने, दोन हजार २१३ ठिकाणी बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या चार हजार १३७ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या. एक हजार १४२ नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जनजागृतीवर दिला जातोय भर

महापालिकेने फक्त कारवाईवरच भर न देता जनजागृती व स्वच्छता उपक्रम राबवण्यास देखील प्राधान्य दिले आहे. यामध्ये घराघरांत माहितीपत्रकांचे वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेबाबत प्रशिक्षण, प्रभागस्तरीय विशेष कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा व औषध फवारणीची सततची मोहीम असे विविध उपक्रम महापालिका राबवत आहे. याशिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घराच्या परिसरात पावसाचे पाणी साचू देऊ नका, घर व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवा, असे आवाहन नागरिकांना महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकाम स्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणीसोबतच नागरिकांसाठी जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत. या मोहिमांमुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिकांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार म्हणाले.