पिंपरी : आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कोणताही कार्यक्रम नसताना काही भाविकांना बनावट प्रवेशपत्रिका देऊन फसवण्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजताच्‍या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदीत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा सुरु आहे. त्यानिमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज  यांच्‍या छापील स्वाक्षरी करून, एकाच क्रमांकाच्या बनावट खोट्या असलेल्या प्रवेशपत्रिका तयार केल्या.  भाविकांना या पत्रिकांच्या आधारे मंदिरात प्रवेश मिळेल असा भ्रम निर्माण केला. भाविकांची फसवणूक केली. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पूर्ववैमानस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका तरुणांवर प्राणघात हल्ला केला. तरुणाला लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी पवळे चौक निगडी येथे घडली.

याप्रकरणी जखमी झालेल्या तरुणाच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीच्या भावात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या भावाला यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

कमी किमतीत सोने देतो म्‍हणून १३ लाखांची फसवणूक

दोन किलो सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दोन चोरट्यांनी १२ लाख ९५ हजार रुपये घेत एकाची फसवणूक केली. ही घटना ताजणे मळा, च-होली परिसरात उघड झाली आहे. याबाबत एका भाजी व्‍यवसायिकाने रविवारी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना तीन सोन्याचे मणी देऊन विश्वास संपादन केला. सोनाराकडे तपासणी केल्यावर ते मनी सोन्‍याचे खरे असल्याचे दिसून आले. त्‍यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी दोन किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्‍याकडून तब्बल १२ लाख ९५ हजार रुपये घेतले आणि पुर्णपणे बनावट सोने देऊन फसवणूक केली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पिंपरीत पिस्‍तुलासह तरुणास अटक

देशी बनावटीचे पिस्‍टल बाळगणा-या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. ही कारवाई पिंपरीतील रेल्वे पटरीजवळ करण्‍यात आली.तुपार उर्फ बंटी बापू भोगील (वय २०, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार रोहित रघुनाथ वाघमारे (वय ३३) यांनी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी तुषार याने अवैधरीत्या सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे देशी पिस्तूल आणि ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतूस बाळगले असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी पिंपरी रेल्‍वे पटरीजवळ फिरताना त्‍याला ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍यांच्‍याकडून एक पिस्‍तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्‍त केला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.