पुणे : राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये एका खेकड्याला लटकवून त्याचा गैरवापर केल्याचा निषेध दर्शवत ‘पेटा इंडिया’ने (पीपल फाॅर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र पाठविले आहे.

एखाद्या प्राण्याचा हा गैरवापर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र आदर्श आचारसंहिता, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने २४ मार्च २०२४ रोजी निवडणूक प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करणारा आदेश, आदर्श आचासंहितेबाबत निवडणूक आयोगाची नियमावली आणि १९ सप्टेंबर २०१२ रोजी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले पत्र यांचे उल्लंघन करत आहे, याकडे पेटा इंडियाने लक्ष वेधले आहे. पशुवैद्यकीय सेवा आणि पुन्हा निसर्गात पुनर्वसन करण्यासाठी खेकड्याला आमच्याकडे सुपूर्द करण्याची विनंती पेटाने आमदार रोहित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा – राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

हेही वाचा – ‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

रोहित पवार यांनी खेकड्याचा केलेला वापर हा पूर्वनियोजित असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. प्रसिद्धीसाठी प्राण्याला नाहक पद्धतीने दुखावले जात होते आणि त्याला त्रास दिला जात होता, असे पेटा इंडियाचे ॲडव्होकेसी असोसिएसट शोर्य अग्रवाल यांनी शरद पवार आणि मीनल कळसकर यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.