Ganesh Visarjan 2025 Update पुणे : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्ला यांनी बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या. शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांनी विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त उत्तमप्रकारे हाताळला होता.
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन सोहळ्यासाठी पुणे शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीकरिता पोलिसांनी मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रकानुसार मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून वेळेत विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विसर्जन सोहळ्याच्या पाश्वर्भूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्यालयात बैठक घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे, निखील पिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत शुक्ला यांनी बंदोबस्ताचा आढावा घेऊन सूचना केल्या.
विसर्जन मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे प्रमुख चौकात उभे केले जाणार आहेत. गर्दीतील चोरी, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसंचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्या राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह विविध विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मध्यभागातील १७ रस्ते बंद
शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरीत वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
विसर्जनसाठी बंदोबस्त
अतिरिक्त पोलीस आयुक्त ४
पोलीस उपायुक्त १२
सहायक आयुक्त ३३
पाेलीस निरीक्षक १४१
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ५५८
पोलीस कर्मचारी ६४४३
गृहरक्षक दलाचे जवान ९७२