पुणे : शिवाजीनगर परिसरात सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. मात्र, दुपारी बारानंतर अनेक मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. आंध्र असोशिएन आणि मॉडेल कॉलेजच्या मतदान केंद्रावर सकाळीही फारशी गर्दी नव्हती. एकूणच शिवाजीनगर परिसरात संथ मतदान सुरू होते. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत २३.२६ टक्के मतदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजीनगरमध्ये मतदान जागृतीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे युनिक मतदान केंद्र, मॉडेल कॉलनीतील विद्या भवन येथे महिलांसाठी पिंक मतदान केंद्र, औंध आयटीआय येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सिबायोसिस येथे युवक मतदान केंद्र, गोखले नगर येथील वीर बाजीप्रभू विद्यालयात दिव्यांगांसाठी विशेष सोयी-सुविधा पुरविणारे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा – मतदानामध्येही कोथरूड आणि कसब्यामध्ये चढाओढ!

निवडणूक आयोगाने कर्मचारी ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगासाठी मदतनीसांची नेमणूक केली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रांवर सावली, पिण्याचे थंड पाणी, ज्येष्ठांना ने-आण करण्याची व्यवस्था पुरवित आहेत. परिचारिका, आशा वर्कर यांच्याद्वारे प्राथमिक उपचाराचीही सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा – श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे यांचे प्राबल्य असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच आतापर्यंत कमी मतदान

प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही मतदारांकडून संथ प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी उन्हामुळे मतदान केंद्रावरील गर्दी कमी झाली होती. विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर बूथ लावून बसले आहेत. त्यांचीही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी धडपड दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discouragement among voters in shivajinagar bjp stronghold only 23 26 percent voting so far pune print news dbj 20 ssb