पुणे: प्रदूषण नियमांचा भंग केल्याप्रकरणी पुणे महापालिकेचा कोंढव्यातील कत्तलखाना बंद करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. पण, संपूर्ण शहरात हा एकमेव कत्तलखाना असून, तो बंद करता येत नसल्याने महापालिकेची कोंडी झाली आहे. याप्रकरणी उपाययोजना करण्यासाठी आता महापालिकेने मंडळाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे.
पुणे शहरात महापालिकेचा कोंढव्यात एकमेव कत्तलखाना आहे. या कत्तलखान्यात प्रामुख्याने म्हैसवर्गीय प्राण्यांची कत्तल केली जाते. या कत्तलखान्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारीला कत्तलखान्याची तपासणी केली. त्या वेळी नियमांचे उल्लंघनप्रकरणी महापालिकेला नोटीस बजावून कत्तलखान्याच्या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
मंडळाने नोटीस बजाविल्यानंतरही महापालिकेने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे मंडळाने अखेर कत्तलखाना बंद करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. या कत्तलखान्याची वीज आणि पाणी बंद करण्याचे निर्देश मंडळाने दिले आहेत.
‘महापालिकेचा हा शहरातील एकमेव कत्तलखाना आहे. त्यास कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. या कत्तलखान्यावर येणारा ताण कमी करण्याबाबत तेथील व्यापाऱ्यांबरोबर बैठकही घेण्यात आली होती. त्यातून कत्तलखान्यावरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. कत्तलखान्याच्या ठिकाणी प्रदूषण कमी करणाऱ्या उपाययोजना सुरू असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेने मंडळाकडे केली आहे,’ असे महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यक अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले.
उल्लंघन नेमके कशाचे?
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता अपुरी
– परिसरात सगळीकडे दुर्गंधीयुक्त सांडपाणी
– कत्तलखाना व्यवस्थापन नियमांचा भंग
– दुर्गंधी रोखण्यासाठी रसायनांची अपुरी फवारणी
– कचऱ्याची योग्य विल्हेवाट नाही
महापालिकेच्या उपाययोजना
– परिसरातील सांडपाणी जमा करण्यासाठी व्हॅक्युम व्हॅन
– सांडपाणी साठवणुकीसाठी पॉलिशिंग टँक
– दुर्गंधी कमी करण्यासाठी सुगंधी रसायनांची फवारणी
– घनकचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट
– सांडपाण्यावर नियमितपणे प्रक्रिया
– नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे नियोजन
शहरात महापालिकेचा सध्या एकच कत्तलखाना आहे. त्यामुळे त्यावर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आणखी एक कत्तलखाना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी जागेचा शोध सुरू आहे. कोंढव्यातील कत्तलखान्यात प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना सध्या सुरू आहेत. – डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका
पुणे महापालिकेच्या कोंढव्यातील कत्तलखान्यासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. आमच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, पर्यावरण नियमांचे उल्लंघन आढळून आले. याप्रकरणी निर्देश देऊनही उपाययोजना न केल्याने कत्तलखाना बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. – डॉ. जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
महापालिका कत्तलखाना
वर्ष | मोठी जनावरे | शेळी | मेंढी |
२०२०-२१ | १२,९६३ | ११,५७२ | १२,१३८ |
२०२१-२२ | १८,४९२ | १५,२१८ | १५,८१० |
२०२२-२३ | १९,२०३ | १९,०७९ | १८,९७९ |
२०२३-२४ | ३३,९०६ | २१,४७३ | २२,६४९ |
२०२४-२५ | ४०,६८४ | १८,४०६ | २७,०५० |