पुणे : जिल्ह्यासाठी नव्याने ११५ आधार नोंदणी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे शहरासाठी २२ तर पिंपरी-चिंचवड शहरासाठी २४ केंद्र आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या पात्र अर्जातून सोडतीद्वारे केंद्र निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
नवीन आधार नोंदणी केंद्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ३५६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७२ अर्ज पात्र ठरले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ११५ पात्र अर्जदारांना नवीन आधार नोंदणी केंद्रांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे उपस्थित होते.
आधार नोंदणी केंद्रासाठी ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता ६५ रिक्त केंद्र जाहीर केली होती. त्यामध्ये ६२ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये एकूण ७ रिक्त केंद्रे जाहीर केली होती. त्यामध्ये सात अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये २२ केंद्रे होती. ती मंजूर करण्यात आली आहेत. तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण २८ नवीन आधार नोंदणी केंद्रे मंजूर आहेत. त्यापैकी २४ अर्जदारांना नवीन आधार नोंदणी केंद्र मंजूर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.