पुणे : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज रात्रीपासून सुरू होत आहे. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. या काळात गर्भवतींना धोका असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात वैद्यकीय क्षेत्राकडून याबद्दल स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. चंद्रग्रहण हे केवळ खगोलशास्त्रीय घटना असून त्याचा गर्भवती महिलांवर अथवा गर्भाच्या विकासावर कोणताही परिणाम होत नाही, असे पुणे ऑब्स्टेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनॅकोलॉजिकल सोसायटी ( पीओजीएस) तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गर्भातील बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होण्यामागे ठोस वैद्यकीय कारणे असतात. त्यामध्ये आनुवंशिक व चयापचयविषयक अडचणी, संसर्ग, काही औषधे, रसायने किंवा किरणोत्सर्ग यांचा समावेश होतो. ग्रहणामुळे गर्भविकासावर परिणाम होतो, असा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या काही परंपरा व गैरसमजांमुळे गर्भवती महिलांवर ग्रहणावेळी बंधने घालण्यात येतात. त्यामुळे त्यांच्या मनात भीती व ताण निर्माण होतो. मात्र या सर्व अंधश्रद्धा असून त्यांना वैज्ञानिक आधार नाही, असे पीओजीएसने स्पष्ट केले.

गर्भवती महिलांना पाठिंबा द्यावा, त्यांना निवांत ठेवावे आणि अशा अनावश्यक बंधनांपासून दूर ठेवावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. चंद्रग्रहण हे निसर्गातील एक अद्भुत दृश्य आहे, वैद्यकीय धोका नव्हे, असा संदेश पीओजीएसने दिला आहे.

समज काय?

खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो. हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. या काळात पूजा-अर्चा ते मंदिरांपर्यंत सर्व काही बंद असते. गर्भवती आणि तिच्या पोटातील गर्भासाठीही हा काळ अशुभ मानला जातो.

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण?

वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले. दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. याला ब्लड मून असेही म्हणतात. भारतीय वेळेनुसार, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल, जे ८ सप्टेंबर रोजी पहाटे १:२६ पर्यंत चालेल. यासोबतच, त्याचा स्पर्श रात्री ११:०९ वाजता सुरू होईल. चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री ११:४२ वाजता असेल,तर त्याचा मोक्षकाल दुपारी १२:२३ वाजता सुरू होईल. हे चंद्रग्रहण सुमारे ४ तास चालेल.

भारतात दिसणार का?

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, पुणे, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता इत्यादी शहरांचा समावेश आहे.भारताव्यतिरिक्त, ते पश्चिम उत्तर अमेरिका, पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका येथे दिसेल.