लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : दिल्लीतील घर विकून डॉक्टर मुलीने आईची दोन कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे उघडकीस आला आहे. याबाबत आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रहाटणीत राहणाऱ्या मुलगी आणि जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचे आई-वडील दिल्लीत राहत होते. मुलगी डॉक्टर असून, जावई बँकेत नोकरीला आहे. फिर्यादीला मुलगाही आहे. मात्र, वडिलांचे निधन झाल्यानंतर मुलगी आणि जावयाने आईला विश्वासात घेऊन वाकड येथे राहण्यास भाग पाडले. त्यासाठी आईचे दिल्लीतील घर दोन कोटी दहा लाख रुपयांना विकायला लावले. आलेल्या पैशांपैकी ९० लाख रुपये आईच्या बँक खात्यात जमा केले. तर, उर्वरित एक कोटी २० लाख रुपये मुलीने स्वत:कडे ठेवले. सप्टेंबर २०१२ मध्ये मुलीने आईला रहाटणी येथे दीड कोटी रुपयांमध्ये नवीन घर घेण्यासाठी राजी केले. त्यासाठी तिने दिल्लीच्या घर विक्रीतून उरलेले एक कोटी २० लाख रुपये आणि आईकडून पुन्हा ४० लाख रुपये घेतले. मुलगी आणि जावयाने कट रचून त्या घरावर आईची कसलीही संमती नसताना स्वत:चे नाव सहमालक म्हणून नोंदवत फसवणूक केल्याचे काळेवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सांगितले.

मुलीने दवाखाना खरेदीकरिता आईला ‘४० लाख रुपये दे, मी तुला त्यात हिस्सा देते’ असे सांगून पैसे घेतले. त्याच पैशातून रहाटणी येथे दुकान विकत घेतले. त्या दुकानात आईने स्वत:चे पैसे गुंतविले असताना तिला कोणताही हिस्सा न देता तसेच तिचे पैसे परत न करता फसवणूक केली. १० डिसेंबर २०१२ रोजी मुलगी आणि जावयाने दुकान खरेदीसाठी नेऊन ते तुझ्या नावावर करून देऊ, असे सांगून १८ लाख ८२ हजार रुपये धनादेशाद्वारे आणि ४० हजार रुपये रोख असे ५८ लाख ८२ हजार रुपयाला दुकान खरेदी केले. परंतु, ते दुकानही आईच्या नावावर न करता तिच्याकडून त्या दुकानाची पूर्ण किंमत घेतली. त्या दुकानात ५० टक्के हिश्श्याने स्वत:चे नाव नोंदवून आईची दोन कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वडिलांचे पासबुक, चेकबुक, पॅनकार्ड, अन्य कागदपत्रे मागितली असता मुलीने आईला मारहाण केली. तसेच, बनावट स्वाक्षरी करून आई-वडिलांच्या संपत्तीची बेकायदा विक्री करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors daughter cheats mother of rs 2 5 crore pune print news ggy 03 mrj