जलसंपदा खात्यातील खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाची जबाबदारी प्रथमच महिला अधिकारी सांभाळत आहेत. नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने या पदावर काम करणाऱ्या श्वेता कुऱ्हाडे यांच्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी अविनाश कवठेकर यांनी साधलेला संवाद.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणी नियोजनाची जबाबदारी कधी आली?

सन १८७९ मध्ये खडकवासला धरण पूर्ण झाले. शहर आणि जिल्ह्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागात ७ जुलै २०२३ रोजी रुजू झाल्यानंतर पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे आली. तोपर्यंत या विभागात कार्यकारी अभियंता म्हणून नेहमी अनुभवी पुरुष अधिकाऱ्यांना संधी दिली जात होती. मला मात्र थेट पहिली महिला कार्यकारी अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यात अनुभव फार कमी. साधारणपणे महिला कमी व्यापाचे, कमी कामाचे कार्यालय निवडतात. त्यांच्यावरील कौटुंबिक जबाबदारी हे त्यामागील प्रमुख कारण. एक महिला अधिकारी जिल्ह्याच्या पाणी नियोजनासाठी काम कसे करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता.

पाणी नियोजन कोणत्या निकषावर होते?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, एमआयडीसी आणि अनेक ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या जिल्ह्यात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. काही काळासाठी पाणीपुरवठा झाला नाही, तर अधिकाऱ्यांकडे २४ तास पाठपुरावा करणारे शहर अशीच पुण्याची ओळख आहे. त्यामुळे पुणेकरांना विनाकपात वर्षभर पाणी देणे सोपे नाही. त्यासाठी योग्य वाटप, वितरण, आखणी, नियोजन मान्यता आणि अंमलबजावणी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करावे लागते.

महिला अधिकारी म्हणून उपजत गुणांचा फायदा कसा झाला?

अधिकारी म्हणून तुमच्याकडील कौशल्याचा कस येथूनच लागतो. पण, महिलांकडे काही गुण उपजत असतात. त्याआधारे जबाबदारी निभावली जाते. घरातील पहिली जबाबदारी असते पाणी भरण्याची. लहानपणापासून आईला या कामात मदत करावी लागत असे. आई घरासाठी किती पाणी भरते, पाण्याची किती गरज आहे, ते पाणी कशासाठी वापरले जाते आणि घरात साठवलेले पाणी किती दिवस पुरते, हा आईने शिकविलेला परिपाठ यानिमित्ताने व्यवहारात उपयुक्त ठरला आणि खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाण्याचे नियोजनही सुकर झाले.

पाणी नियोजनाचा आजवरचा अनुभव कसा?

सन २०१६ मध्ये मोठा दुष्काळ असताना लातूर शहरात बदली झाली होती. तेथे रेल्वेने पाणी येत होते. कारण, सर्व पाणीसाठे शून्य झाले होते. त्यामुळे पाण्याची बचत आणि काटकसर काय असते ते समजले. पाण्याचा पुनर्वापर का आणि कसा करायचा याची मोठी, प्रत्यक्ष परीक्षा झाली. पाणी नियोजनाचा अनुभव यातून समृद्ध झाला. तीच बाब पुणे शहर आणि जिल्ह्याचे पाणी नियोजन करताना उपयुक्त ठरत आहे.

avinash.kavthekar@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experience from latur drought useful in pune water planning pune print news apk 13 ssb