लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार रिक्त जागांसाठी २३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या (बीएचएमसीटी) प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केला आहे.

सीईटी सेलने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या विविध व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवणाऱ्या शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित, खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्षाच्या एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशांनंतर (कॅप) रिक्त राहिलेल्या जागा, संस्थास्तरावरील कोट्यातील प्रवेशांच्या रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नॉन कॅप नोंदणी प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमबीए, एमसीए अभ्यासक्रमाच्या लॅटरल एंट्री प्रवेश, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा-दांडीयातील भांडणातून चाकूने वार करत अल्पवयीन मुलाचा खून, निगडीतील घटना

केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागा, संस्थास्तरावरील रिक्त जागांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या ई स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष पडताळणीद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था स्तरावर तयार केली जाईल. अधिक माहिती https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of admission for mba mca hotel management degree pune print news ccp 14 mrj