पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली. राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक २१ नोव्हेंबरपासून राज्य मंडळाच्या http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>>मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?

दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. त्यानंतर निकाल मे-जूनमध्ये जाहीर केला जातो. या दरम्यान विविध प्रवेश परीक्षा होतात. तसेच नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये होते. या सर्व प्रक्रियेत जाणारा वेळ, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणे, प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अंतिम वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final time table for class 12th 10th examination has been announced by the state board pune print news ccp 14 amy