पिंपरी : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांची पावले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहे. मात्र, महापालिकेचे शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत. तर, पाच तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. मार्च महिना सुरू झाला असताना वातावरणातील तापमानही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, पोहोण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होवू लागली आहे.

हेही वाचा…पिंपरी : अखेर भोसरीतील कृत्रिम धावमार्ग खेळाडूंसाठी खुला

पालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहोण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच मासिक पास ५०० रुपये, तिमाहीसाठी १२०० तर वार्षिक ४५०० रुपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असतानाही पाच तलाव अद्याप कुलूपबंद आहेत.

थेरगाव, मोहननगर, यमुनानगर, निगडी आणि भोसरी येथील जलतरण तलावाचे कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावावर जास्त पैसे मोजून पोहोण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेच्या तलावावर पोहोण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने मासिक पासही ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा…साखरेची ‘गोड’ बातमी : यंदा साखर मिळणार मुबलक

सुरू असणारे तलाव

नेहरूनगरमधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळेगुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरीवाघेरे, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे, सांगवीतील बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई अक्वामरिन हे आठ तलाव सुरू आहेत.

बंद तलाव

थेरगावातील खिंवसरा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, प्राधिकरणातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद आहेत.

हेही वाचा…पिंपरी : थेरगावात ६० खाटांचे कर्करोग रुग्णालय

स्थापत्यविषयक कामामुळे दोन तलाव बंद आहेत. एक तलाव आठ दिवसांत सुरू होईल. तर, दोन तलावांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करून कामाचा आदेश देण्यात येणार आहेत, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five out of thirteen pimpri chinchwad municipal corporation swimming pools yet closed in summer season pune print news ggy 03 psg