पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता (२० ऑगस्ट) होणार आहे. त्यानंतर तातडीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठ चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. दरम्यान, हा उड्डाणपूल तातडीने खुला करावा, अशी मागणी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. उड्डाणपूल खुला न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

विद्यापीठ चौकामध्ये, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थानांतर्गत एकात्मिक उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी २७७ कोटींचा खर्च झाला असून, पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय या अंतरामध्ये महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार ४५ मीटर पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण करण्याचे नियोजित होते. मात्र, काही अडचणींमुळे ते होऊ शकले नाही. वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने उड्डाणपुलाची काम झालेली मार्गिका वाहतुकीसाठी तातडीने खुली करावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. राजकीय दबावानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध-शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) देण्यात आली. शिवाजीनगर ते औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित बाणेर आणि पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी दिली.

उड्डाणपुलाच्या कामाला ऑगस्ट २०२२ मध्ये प्रारंभ करण्यात आला होता. त्यापूर्वी अस्तित्वातील दोन एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट २०२० मध्ये पाडण्यात आले होते.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन कधी ?

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाबरोबरच सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या दोन्ही पुलांची उद्घाटने एकाच वेळी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह दरम्यान राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा उड्डाणपूल आणि विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम चित्रपटगृह हा २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी यापूर्वीच खुला करण्यात आला आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील गोयल गंगा चौक ते इनामदार चौक हा १ हजार ५४० मीटर लांबीचा उड्डाणपूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. या उड्डाणपुलाची सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

एकूण लांबी- १.७ किलोमीटर

औंध ते शिवाजीनगर १.३० किलोमीटर लांबी

तीन मार्गिका ९.५ मीटर रुंदी

दोन खांबांमधील अंतर २८ मीटर

प्रकल्पाची किंमत- २७७ कोटी रुपये