पुणे : येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात गुंड गजा मारणेला हलविण्यात येत असताना पोलीस व्हॅनचा मागावर असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या चार महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. गजा मारणे याची सातारा परिसरातील ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेच्या सांगलीतील साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली, तसेच याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

कोथरुड भागात संगणक अभियंत्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह सहा जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. याप्रकरणात यापूर्वी मारणेच्या दोन महागड्या मोटारीसह चार मोटारी जप्त केल्या होत्या. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला सांगली कारागृहात हलविण्यात येत असताना व्हॅन सातारा परिसरातील एका ढाब्यावर थांबविण्यात आली. पोलीस व्हॅनबरोबर मारणेचे साथीदार मोटारीत होते.

ढाब्यावर थांबलेल्या व्हॅनजवळ मोटारी आल्या. मारणेला साथीदारांनी व्हॅनमध्ये नेऊन बिर्याणी खाण्यास दिली. मारणेबरोबर बंदोबस्तास असलेल्या सहायक निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर जेवण केले. या प्रकाराची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चार पोलिसांना निलंबित केले. मारणेला बिर्याणी देणारे, तसेच त्याला भेटायला आलेले साथीदार पांडुरंग उर्फ पांड्या मोहितेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहिते याला गुन्हे शाखेने सांगलीतून नुकतीच अटक केली.

पोलीस व्हॅनचा मारणेच्या साथीदारांनी मोटारीतून पाठलाग केला. सीसीटीव्ही चित्रीकरणात सहा ते सात मोटारी आढळून आल्या आहेत. याप्रकरणात चार मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित मोटारचालकांचा शोध घेण्यात येत आहे. कोथरूड मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी मारणेसह साथीदारांच्या आठ मोटारी जप्त केल्या आहेत, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले.