लोनॲपच्या माध्यमातून नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. चोरट्यांच्या टोळीला अटक केल्यानंतर लोनॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरू आहे. पोलिसांच्या आवाहनाकडे काणाडोळा करून नागरिक चोरट्यांच्या जाळ्यात सापडत असून ऑक्टोबर महिन्यात लोनॲप फसवणुकीच्या २१० तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा >>>पुणे : गणेशोत्सव मंडळातील आर्थिक व्यवहारातून अध्यक्षाला मारहाण ; रविवार पेठेतील घटना

लोनॲपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सोलापूर, पुणे, बंगळुरुतून अटक केली. या प्रकरणात अठरा जणांना अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोनॲपवर कारवाईचा बडगा उगारला तसेच नागरिकांनी लोनॲपकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केली. त्यानंतर लोनॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात अशा प्रकाराच्या २१० तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिवाळीत सायबर पोलीस ठाण्यात ४७ तक्रारी दाखल झाल्या, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाला अडथळा, खेड तालुक्यातील मार्ग बदलला; सुधारित आराखडा रेल्वेला सादर

करोना संसर्गाच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. वेतन न मिळाल्याने अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्या वेळी चोरट्यांनी लोनॲपच्या माध्यमातून अनेकांना त्वरित कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक केली. कर्जाची परतफेड न केल्यास समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, धमकावण्यामुळे कर्जदार हैराण झाले. वारजे भागात एका युवतीने लोनॲपच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी युवतीने आजीचा खून केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी शहरात घडली. विमाननगर भागातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. लोनॲपच्या तगाद्यामुळे त्रासलेल्या अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये भूजल सप्ताहाचे आयोजन

तीन वर्षांत चार हजार ७७८ तक्रारी दाखल
सामान्यांना नाडणाऱ्या लोनॲपच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून लोनॲपच्या विरोधात चार हजार ७७८ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

फसवणुकीचे जाळे
प्ले स्टोअरवर ६०० बनावट ऑनलाइन लोनॲप आहेत. ॲप डाउनलोड केल्यानंतर मोबाइल संचातील सर्व गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. ॲपच्या माध्यमातून गरजूंना कर्जाचे आमिष दाखवून कर्ज घेण्यास प्रवृत्त केले जाते. कर्जाची परतफेड न केल्यास धमकावले जाते. समाजमाध्यमावर छायाचित्र तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याची धमकी दिली जाते.