पोलीस अधिकारी असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीची फसवणूक आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आबालू इराणी असं अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध शहरांत गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेले आहे. त्याला निगडी परिसरातून अटक करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिसरामध्ये पोलीस असल्याचं सांगून विविध नागरिक आणि महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एका स्पोर्ट बाईकचादेखील समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात सराईत गुन्हेगार इराणी हा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आल आहे.
हेही वाचा – पुणे : वानवडीत सोसायटीमध्ये जाऊन टोळक्याची दहशत; रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी
आरोपी इराणीकडे क्राइम ब्रांच पोलीस अधिकारी असल्याचे एकूण चार बनावट ओळखपत्रे मिळाली असून तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत होता. इराणीवर महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, ठाणे, भाईंदर, खंडाळा, भोईसर या ठिकाणी एकूण २० गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलीस असल्याचं दाखवून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेची फसवणूक केली असेल, अशी घटना घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या टीमने केली आहे.