पुणे : कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. घोरपडीतील एम्प्रेस गार्डनपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळला जात होता. वानवडी पोलिसांनी कारवाई करून या प्रकरणी सहा जणांना अटक केली. आरोपींकडून झुंजीसाठी वापरण्यात आलेले सहा कोंबडे, पाच मोबाइल संच, तीन दुचाकी, पिशव्या, दोन हजार ५८० रुपये असा पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमोल सदाशिव खुर्द (वय ४७, रा. रविवार पेठ), मंगेश आप्पा चव्हाण (वय ५५, रा. भवानी पेठ), निखिल मनीष त्रिभुवन (वय २०, रा. घोरपडी), सचिन सदाशिव कांबळे (वय ४२, रा. भवानी पेठ), प्रणेश गणेश पॅरम (वय २७, रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे अधिनियम कलम ११ (इ), (न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोरपडीतील एम्प्रेस गार्डन परिसरातील एका बंगल्याजवळ असलेल्या माेकळ्या जागेत कोबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी गोपळ मदने आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली. त्यावेळी तेथे कोंबड्यंच्या झुंजीवर जुगार खेळण्यात येत असल्याचे दिसून आले. आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्या काहीजणांना पैसे लावण्यास सांगत होते. पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांनी शहरातील अन्य ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोंबड्यांची ने-आण करण्यासाठी त्यांनी तंगुसपासून बनविलेल्या पिशव्यांचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमोले, अर्शद सय्यद, सुजाता फुलसुंदर यांनी ही कामगिरी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालायत हजर करण्यात आले. न्यायालायने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.