पुणे : सदनिकेत गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना धनकवडीतील एका सोसायटीत रविवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. बाबुराव दत्तात्रय महामुनी (वय ९९, रा. ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटी, धनकवडी ) असे गंभीर जखमी झालेल्या जेष्ठाचे नाव आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटीत रविवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागल्याची अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असता, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत गॅस गळती होऊन आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कात्रज आणि गंगाधाम केंद्रातील जवानांनी सहाव्या मजल्यापर्यंत पाईप नेऊन आग आटोक्यात आणली.

सदनिकेत अडकलेल्या महामुनी यांना जवानांनी बाहेर काढले. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले. आगीत सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, जवान किरण पाटील, विनायक घागरे, योगेश कुंभार, अक्षय देवकर, शुभम बोबडे, बंडू गोगावले, राजेश घडशी, शैलेश गोरे, अक्षय मोढे, ज्ञानेश्वर कदम, धनंजय भिसे, प्रसाद शिंदे यांनी आग आटोक्यात आणली.