पुणे : ग्रोधा हत्याकांडात जन्मठेप झालेल्या आरोपीने कारागृहातून संचित रजा मिळवून (पॅरोल) पुणे आणि नाशिक जिल्ह्यात साथीदारांच्या मदतीने वाहनचालकांना अडवून लुटमारीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी गोध्रा हत्याकांडातील आरोपीसह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना अटक केली. या टोळीने आळेफाटा, मंचर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १४ लाख ४१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी सलीम उर्फ सलमान युसूफ जर्दा (वय ५५), साहिल हनीफ पठाण (वय २१), सुफीयान सिकंदर चँदकी (वय २३,) आयुब इसाग सुनठीया (वय २९), इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१, सर्व रा. गोध्रा, गुजरात) यांना अटक करण्यात आली. आरोपी सलीम जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातून तो संचित रजा (पॅरोल) मिळवून तो बाहेर पडला. त्यानंतर तो कारागृहात परतला नाही. फरार झाल्यानंतर आरोपी सलीम जर्दाने साथीदारांशी संगनमत करुन घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. आळे फाटा परिसरात या टोळीने एका टेम्पोचालकाला लुटले होते. टेम्पोतील टायर ट्यूब चोरून आरोपी पसार झाले होते. या टोळीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

त्यानंतर आळेफाटा पोलिसांच्या पथकाकडून तपास सुरू करण्यात आला. वाहनचालकांना अडवून लूटमार करणारी टाेळी गुजरातमधील असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. आरोपी नाशिकमधील चांदवड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने आराेपी जर्दा याच्यासह साथीदारांना सापळा लावून पकडले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शाखाली आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक निरीक्षक अमोल पन्हाळकर, चंद्रा डुंबरे, विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, अमित माळुंजे, नवीन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godhra train carnage accused arrested by pune police in theft cases material of 14 lakhs seized pune print news rbk 25 css