लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे पुरविण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. वस्त्यांमधील प्रत्येक घराला ‘गुगल प्लस कोड’ देणे, त्यांच्या शाश्वत विकासासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे.

महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग आणि शेल्टर असोसिएट्स यांच्यातर्फे आठ झोपडपट्ट्यांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षण केले जात आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पायाभूत सेवासुविधा अधिक सक्षमपणे उभारणे, नागरिकांना वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे, जलःनिसारण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, आरोग्य वैद्यकीय सेवा, अभ्यासिका असे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा… रक्षक झाला भक्षक…, पोलीस कर्मचाऱ्याकडून शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन

जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक घर क्रमांक देऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. कुटुंबाची माहिती, घर व शौचालय स्थिती, कचरा व्यवस्थापन आदी माहिती संकलित केली जाणार आहे. वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारणे, युवक-युवतींना तांत्रिक शिक्षण देणे, वैद्यकीय व आरोग्य सेवा दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रमाबाईनगर, रामनगर (आकुर्डी), गवळीमाथा (भोसरी), संजय गांधीनगर (मोशी), शांतिनगर (भोसरी), शास्त्रीनगर (पिंपरी), काटेवस्ती (दापोडी), संजयनगर (वाखारेवस्ती) या आठ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.

झोपडपट्टीमधील भौतिक सेवा-सुविधा, शाश्वत विकासासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. प्रत्येक घराला क्रमांक देऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात आठ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याला झोपडीवासीयांनी सहकार्य करावे. – अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google plus code for slums in pimpri chinchwad for their sustainable development pune print news ggy 03 dvr
Show comments